मेढा (ता. जावली) — महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून पाचवड–खेड नवीन महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या रस्त्यामुळे पाचवड, मेढा आणि परिसरातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून स्थानिक नागरिकांकडून या कामाचे स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान, मेढा येथे मेढा–मोहाट पुलाजवळ सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे काही काळासाठी मेढा स्मशानभूमीकडे जाणारा अंतर्गत रस्ता बंद झाला होता. त्यामुळे अंत्यविधी व इतर अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब गांभीर्याने लक्षात घेतल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्काळ हस्तक्षेप केला.
या संदर्भात संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून परिस्थितीची पाहणी करण्यात आली. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कोणत्याही परिस्थितीत बंद राहू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले.
सूचना मिळताच संबंधित ठेकेदाराने तात्काळ कामाची अंमलबजावणी सुरू करत स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खुला करण्याची कार्यवाही हाती घेतली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. रूपालीताई वारागडे, उपनगराध्यक्ष श्री. विकासजी देशपांडे, नगरसेवक शिवाजी देशमुख, नगरसेवक नितीन मगरे, नगरसेवक धनंजय पवार, युवा नेते संतोषजी वारागडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित लोकप्रतिनिधींनी विकासकामांसोबतच नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली.