मेढा नगरपंचायत निवडणूक २०२५ : भाजप उमेदवारांचा झंझावाती प्रचार

मेढा – आगामी मेढा नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला जोरदार वेग आला आहे. नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. रुपालीताई संतोष वारगडे आणि प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक पदाचे पक्षाचे उमेदवार नितीन बाबासाहेब मगरे यांच्या समर्थनार्थ आज भव्य आणि उत्स्फूर्त अशा झंझावाती प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले.
प्रचारादरम्यान परिसरातील नागरिकांचा उत्साह, महिलांचा मोठा सहभाग आणि युवकांची उपस्थिती विशेषत्वाने दृष्टीस पडली. घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत दोन्ही उमेदवारांनी विकासाभिमुख भूमिका मांडली. मेढा शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारफेरीत “विकासासाठी भाजपला साथ द्या” या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.